चित्रपट बनविण्यापूर्वी - ओळख सोळा मूलभूत घटकांची

'चित्रपट बनविण्यापूर्वी - ओळख सोळा मूलभूत घटकांची' या शीर्षकाचे पुस्तक मी लिहायला घेतले आहे. 

तसा मी या क्षेत्रातला तज्ञ वगैरे नाहीये, आहे साधा विद्यार्थीच, गेली पाच वर्षे मी चित्रपट विषयक अभ्यास करतोय. पण ‘जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे।’ या उक्तीनुसार मला जे जे सापडले-समजले ते माझ्या ब्लॉगवर मराठीतून आतापर्यंत मांडत आलो आहे. ब्लॉगची लिंक - https://filmstudybymiteshtake.movie.blog/

या ब्लॉगच्या निमित्ताने फिल्ममेकिंच्या अनेक विद्यार्थ्यांबरोबर संवाद होतात, चर्चा होतात यातून असे लक्षात आले की सिनेमा खूप जणांना शिकायचा आहे पण बहुतांश जणांची एकच अडचण आहे ती म्हणजे सिनेमा शिकण्यासंदर्भात शैक्षणिक साहित्य मराठीत पुरेसे उपलब्ध नाही.

या कामात आपला खारीचा वाटा उचलावा म्हणून मी ठरवले की गेल्या पाच वर्षात आपल्याला जे समजले-उमजले ते पुस्तकरूपाने मांडावे. सिनेमाची भाषा, सिनेमाचे व्याकरण यावर आपल्या वकुबानुसार लिहावे !

माझ्या समजेनुसार, सिनेमाचे स्टोरी टेलिंग सोळा मूलभूत घटकांच्या द्वारे केले जाते. खरे तर स्टोरी टेलिंग (कथाकथन) या ऐवजी स्टोरी प्रेझेंटेशन (कथा सादरीकरण) हा शब्द मला अधिक योग्य वाटतो. तर हे सादरीकरण करण्याचे पायाभूत सोळा घटक खालील प्रमाणे आहेत -
1. कथा
2. पटकथा
3. संवाद
4. अभिनेते निवड (कास्टिंग )
5. स्थळ निवड (लोकेशन्स )
6. दिग्दर्शन
7. पात्र रेखाटन (कॅरॅक्टरायझेशन)
8. अभिनय
9. छायाचित्रण (कॅमेरा)
10. प्रकाश व्यवस्था (लाईट्स)
11. कला दिग्दर्शन (आर्ट डिरेक्शन)
12. वेशभूषा/ पेहराव (कॉश्युम्स/ वॉर्ड रोब)
13. रंगभूषा (मेकअप)
14. संगीत
15. ध्वनी
16. संकलन (एडिटिंग)

मी ही जी मांडणी करतोय ही योग्य आहे का ? मला सोप्या भाषेत समजावून सांगता येते का ? सिनेमाच्या विद्यार्थ्यांना यासंदर्भात काय अडचणी असतात ? या मांडणीसंदर्भात विद्यार्थ्यांचे काय फीडबॅक आहेत ? हे तपासण्यासाठी सध्या या विषयावर मी कार्यशाळा सुध्दा घेत आहे. या कार्यशाळांमधून मला खूप शिकायला मिळत आहे. याचा पुस्तक लिखाणाला खूप फायदा होईल. दरम्यान काही मराठी चित्रपटांसाठी सहायक म्हणून पण काम करत आहे, या अनुभवाचाही फायदा होईल. 

येत्या वर्षात, 2023 या सालात हे पुस्तक प्रकाशित करायचे असा मी संकल्प केला आहे. पण पुस्तक लिखाणाचे काम अपेक्षित वेगाने अजिबात होत नाहीये. म्हणून मुद्दामहून हा संकल्प सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. कारण मी एका ठिकाणी वाचले होते की तुमचा संकल्प तडीस नेण्यासाठी तुमच्या स्वतःवर दबाव बनवायचा असेल तर तुमचा संकल्प तुमच्या मित्रांना, सहकार्यांना, नातेवाईकांना सांगा. म्हणजे मग ते नियमितपणे तुम्हाला त्याबाबत विचारणा करतील आणि तो तडीस नेण्यासाठी त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल. 


Comments